नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेच्या नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी झाल्यानंतर आता सदस्यांना विविध समित्यांवर स्थान देण्यात आले आहे. चीनसोबतचा तणाव वाढला असताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांना संरक्षण विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे. राहुल गांधींचा विश्वासू मोहरा कॉंग्रेस खासदार राजीव सातव यांनाही संरक्षण विभागाच्या संसदीय समितीत स्थान देण्यात आले आहे.
भाजप खासदार उदयनराजे भोसले यांना रेल्वे, शरद पवार आणि राजीव सातव यांना संरक्षण तर प्रियांका चतुवेर्दी यांना वाणिज्य विभाग संबंधित संसदीय स्थायी समितीवर नियुक्त करण्यात आले आहे.
भाजप खासदार भागवत कराड यांची पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विभागाशी संबंधित संसदीय स्थायी समितीवर वर्णी लागली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी या नियुक्त्या केल्या. रामदास आठवले यांच्याकडे केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्रीपद असल्याने त्यांना कोणत्याही समितीमध्ये पाठवण्यात आलेले नाही.