अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, जिल्हा सरचिटणीस व सामाजिक कार्यात झोकून दिलेले तसेच राष्ट्रवादी पक्षातर्फे आरिफ पटेल (मेंबर) यांनी नि:स्वार्थी सेवा केली आहे. त्यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यपदी अथवा एखाद्या महामंडळावर राष्ट्रवादीकडून घेण्यात येऊन सेवेची संधी द्यावी, अशी मागणी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे केली आहे.
आरिफ पटेल हे गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रवादीचे काम करीत आहेत. पटेल हे अहमदनगर येथील कायम रहिवासी असून, त्यांचा लोकसंपर्क चांगला आहे. त्यांची सामाजिक स्तरावर मोठी कीर्ती आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ गोरगरीबांना मिळवून देण्यासाठी ते झटत असतात. लॉकडाऊन काळात गरीबांना धान्य व इतर जीवनावश्यक मदत त्यांनी स्वखर्चातून केली आहे.
आरिफ पटेल यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून समाजापयोगी कार्य केले असून यामुळे पक्षाच्या नावलौकिकात भर पडली आहे. केवळ पक्षासाठी त्यागाची भूमिका घेणारे मुस्लिम समाजातील जुनेजाणते कार्यकर्ते आरिफ पटेल यांना पक्षाच्यावतीने विधानपरिषदेवर स्थान मिळावे, अशी अपेक्षा नज्जू पहेलवान यांनी व्यक्त केली. पटेल यांच्यासारख्या धडाडीच्या कार्यकर्त्याला विधानपरिषद वा एखाद्या महामंडळाच्या उच्चपदी स्थान देऊन अल्पसंख्याक कार्यकर्त्याला सन्मान मिळवून द्यावा, अशी मागणी नज्जू पहेलवान यांनी केली आहे.
मागणीचे इ-मेल उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री हसन मुश्रीफ, नामदार प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार यांनाही पाठविल्या आहेत. खासदार शरद पवार हे आरिफ पटेल यांचा नक्कीच विचार करतील, असा विश्वास नज्जू पहेलवान यांनी व्यक्त केला आहे.
त्याचबरोबर कर्जत येथील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सय्यद जकी, सुरेश जगधने, निसार सर्फराज शेख, नगरचे नसीर शेख, मिर्झा गालिब शेख आदींनीही आमदार रोहित पवार यांना साकडे घालून, आपण शरद पवारसाहेबांना आरिफ पटेल यांच्यासाठी विधानपरिषदेवर नियुक्तीसाठी शिफारस करावी, त्यांच्या नावाचा विचार करण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.
राज्यपाल नियुक्त विधानसभेसाठी मुस्लिम समाजाला संधी द्यावी ज्येष्ठ नगरसेवक नज्जू पहेलवान
• SHAIKH AMIN HUSAIN