५ वर्षांत पोटच्या ५ मुलांची हत्या; मांत्रिकाच्या सांगण्यावरून नराधम पित्याचे कृत्य


जिंद (वृत्तसंस्था) : हरयाणातील जिंदमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मांत्रिकाच्या सांगण्यावरून नराधम पित्यानं गेल्या पाच वर्षांत आपल्या पोटच्या पाच मुलांची हत्या केली. या प्रकरणी जिंद पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.


एका पित्यावरच आपल्या पाच मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. अलीकडेच संशयित आरोपीची ११ वर्षांची मुस्कान नावाची मुलगी आणि ७ वर्षांची निशा यांचा बुडून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांची हत्या झाल्याच्या संशयावरून आणि याआधी एका मुलीची आणि दोन मुलींची हत्या केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक केली आहे. एका मांत्रिकाच्या सांगण्यावरून पित्यानेच आपल्या पाच मुलांची हत्या केल्याचं बोललं जात आहे. जुम्मा (वय ३८) असं या व्यक्तीचं नाव आहे. पाच वर्षांत आपल्या पाच मुलांना गमावल्याचं तो सांगत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याच्या मुलाचा मृत्यू झाला होता.


त्यानंतर दोन वर्षांनी एक मुलगी खेळताना मरण पावली. काही महिन्यांनंतर एका मुलाला अचानक उलट्या होऊ लागल्या आणि त्यात त्याचा मृत्यू झाला. दोषींना शिक्षा व्हायला हवी अशी तो मागणी करत आहे. धक्कादायक बाब म्हणजे जुम्मा यानं आपल्या मुलांच्या मृत्यूनंतर विच्छेदन करू दिलं नाही.