इलेक्ट्रिक वायर चोरीप्रकरणी दुधोडीतील एकास अटक
कर्जत : प्रतिनिधी

कर्जत तालुक्यातील दुधोडी येथील सुरेश मोहन परकाळे (वय : २७) याला इलेक्ट्रिक वायर चोरीप्रकरणी कर्जत पोलिसांनी सोमवारी सकाळी अटक केली. दुधोडी, भांबोरा भागातील नदी, विहीर व बोअरवेलमध्ये बसविलेल्या इलेक्ट्रिक मोटार, केबल तोडून त्यातील तांब्याची तार काढून नेण्याचे प्रकार वाढले होते. यावर पोलिसांनी ठोस कारवाई करत एकाला जेरबंद केले. पोलिसांच्या या धडक कारवाईचे भीमा पट्ट्यातील शेतकर्‍यांकडून स्वागत केले जात आहे.

इलेक्ट्रिक वायर चोरीच्या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. रात्री उशिरा हे प्रकार घडत असल्याने चोरट्यांचा शोध घेणे अवघड झाले होते. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक कारवाईसाठी रवाना करण्यात आले होते.

पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग वीर, अमित बरडे, संपत शिंदे, पोलीस हवालदार उमाकांत गावडे यांनी आरोपीला दुधोडी येथून अटक केली. आरोपीला १७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले आहे.पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल पांडुरंग वीर करीत आहेत.