मे रोजी घराघरांवर फडकणार लाल बावटा* *भारतीय कम्युनिस्ट पक्षातर्फे कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त 1 ते 5 मे दरम्यान सोशल मीडियावर प्रबोधन मोहीम*


  • मुंबई, ता. 30 : जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने कामगार दिन ते मार्क्स जयंती म्हणजेच 1 मे ते 5 मे दरम्यान सोशल मीडियावर प्रबोधनाची मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार पक्षाने आपल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना व संलग्न जनसंघटनांच्या कार्यकर्त्यांना 1 मे रोजी सकाळी ठीक 8 वाजता 'फिजिकल डिस्टन्सिंग'चे योग्य नियम पाळून आपापल्या घरांवर लाल बावटा फडकवून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या शहिदांना अभिवादन करण्याचे आवाहन केले आहे.

     

    शिकागो शहरातील कामगारांनी 8 तासांचा कामाचा दिवस या मागणीसाठी दिलेल्या लढ्याच्या स्मृतिनिमित जगभर 1 मे रोजी कामगार दिन साजरा केला जातो. तसेच 105 कामगार, शेतकऱ्यांच्या लढ्यातून साकारला गेलेल्या संयुक्त महाराष्ट्राचा स्थापना दिन 1 मे असून, यानिमित्त पक्षाच्यावतीने दरवर्षी पक्ष कार्यालयासमोर झेंडावंदन, शहरातून रॅली, चर्चासत्रे, व्याख्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. पण सध्या लॉकडाऊनची स्थिती असल्याने एकत्र जमून कामगार दिन व महाराष्ट्र दिन करणे शक्य नसल्याने, भारतीय कम्युनिस्ट पक्षाने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनोख्या पद्धतीने यंदाचा 1 मे दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पक्षाच्यावतीने 5 दिवसांची  मोहीम हाती घेतली जाणार असून, त्याचा प्रारंभ 1 मे पासून होत आहे.

     

    1 मे रोजी सकाळी 10 वाजता पक्षाच्या 'सीपीआय महाराष्ट्र' या फेसबुक पेजवर देशपातळीवरील कामगारांची सर्वात पहिली संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'आयटक' संघटनेच्या राष्ट्रीय महासचिव कॉ. अमरजीत कौर या 'सद्यस्थितीत कामगार चळवळीपुढील आव्हाने' या विषयावर लाईव्ह व्याख्यान देणार आहेत. दुपारी 12 वाजता भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय नेते कॉ. डॉ. भालचंद्र कानगो यांचे 'संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात कम्युनिस्टांचे योगदान, संयुक्त महाराष्ट्राची 60 वर्षे आणि आजची आव्हाने' या विषयावर फेसबुक लाईव्ह व्याख्यान होणार आहे.

     

    संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी नेते लोकशाहीर कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या उस्मानाबाद जिल्हा शाखेच्यावतीने 'चला समजून घेऊया अण्णा भाऊंना' या विषयावरील 5 दिवसीय व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली असून, 1 ते 5 मे दरम्यान रोज सायंकाळी 5 वाजता मान्यवरांची व्याख्याने होणार आहेत. यातील पाहिले पुष्प 1 मे रोजी ज्येष्ठ साहित्यिक व सुप्रसिद्ध वक्ते प्रा. शरद गायकवाड गुंफणार असून, ते 'अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य आणि त्या साहित्यातील विद्रोही नायक-नायिका' या विषयावर भाष्य करणार आहेत. 

     

    1 मे रोजी सायंकाळी 7 वाजता शाहीर कॉ. सदाशिव निकम शाहिरी जलशातून आणि रात्री 8 वाजता प्रा. डॉ. समाधान इंगळे आणि कॉ. अमरजीत बाहेती चळवळींच्या गाण्यांमधून कॉ. अण्णा भाऊंना मानवंदना देतील. ही सर्व व्याख्याने आणि कार्यक्रम पाहण्यासाठी फेसबुकवर cpimaharashtrapage ला भेट द्यावी, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांनी केले आहे.