श्रीनगर: जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र उमर अब्दुल्ला यांच्यावरील नजरकैद हटविण्यात आली आहे. उमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांच्यावर ५ फेब्रुवारी या दिवशी सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत (पीएसए) कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर दोन महिन्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच त्यांच्यावरील ही कारवाई मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांच्यावर सार्वजनिक सुरक्षा कायद्यांतर्गत करण्यात आलेल्या कारवाईला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. खबरदारीचा उपाय म्हणून उमर अब्दुल्ला यांना ५ ऑगस्टला ताब्यात घेण्यात आले होते. त्याचा कालावधी २ फेब्रुवारीला समाप्त झाला होता. दरम्यान २ फेब्रुवारीआधीच उमर अब्दुल्ला यांच्यावर पीएसएअंतर्गत कारवाई करण्यात आली होती. या कारवाईला उमर यांची बहीण सारा पायलट यांनी सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते.
जम्मू-काश्मीर: उमर अब्दुल्ला याची नजरकैदेतून सुटका